राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस...
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे देखील आहेत.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला होता.
शिवाजी कर्डिले यांनी सरपंच म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील ते सक्रीय होते. २००९ ला त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढली. त्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर पुन्हा २०१४ ला राहुरी मतदारसंघातून विजय मिळवला होता. २००९ ते २०१४ असे सलग दहा वर्ष त्यांनी राहुरीचे विधानसभेत नेतृत्व केले होते.
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा पराभव करत त्यांनी विजयाच्या हॅट्रीकपासून रोखले होते. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत या पराभवाची परत फेड करत कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरेंना पराभूत केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील.


COMMENTS