मुंबई : बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाएल्गार मोर्चा काढण्यात आला. सरकारच्या शिष्टमंडाळाने बच्चू कड...
मुंबई : बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाएल्गार मोर्चा काढण्यात आला. सरकारच्या शिष्टमंडाळाने बच्चू कडू यांची भेट घेतल्यानंतर आज (30 ऑक्टोबर) सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलण्यात आली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी बच्चू कडू यांच्यासह इतर शेतकरी नेते बैठकीत उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे बैठक सुरू असतानाच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीत महसूल, वित्त, कृषी, सहकार आणि पणन या विभागांचे अपर मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, मुंबईचे अध्यक्ष तसंच बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी या समितीत सहभागी असणार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येत्या 6 महिन्यात समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून शेतकरी कर्जमुक्तीसाठी समिती शिफारसी सुचविणार आहे. तसेच अल्पकालीन व दीर्घकालीन शिफारशी सुचविण्याचे काम समिती करणार आहे. याशिवाय कर्जमाफीबाबत बैठक सकारत्मक झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळाले पाहिजे, यावर भर दिला जाणार आहे. तसेच 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय घेण्यात येईल. आम्ही कर्जमाफीच्या बाजूने आहोत, अशी भूमिका फडणवीस यांनी यावेळी मांडली.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, बैठक सकारात्मक झाली आहे. आम्हाला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात तारीख हवी होती. त्याबद्दल राज्य सरकारने आम्हाला तशी तारीख दिली आहे. 30 जून 2026 पर्यंत समिती आपला निर्णय देईल. त्यानंतर शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.


COMMENTS