पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येत नवा ट्विस्ट आला आहे. पत्नी चैताली हिने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवा...
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येत नवा ट्विस्ट आला आहे. पत्नी चैताली हिने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याच्या मदतीने हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे नकुल भोईर हत्याकांडात मोठा उलगडा झाला आहे. नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला होता. रागाच्या भरात असलेल्या पत्नीने पती नकुलचा कापडाने गळा आवळून खून केला, अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र, आता या हत्याकांडात तिचा मित्रही सहभागी असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी चैताली आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. 24 ऑक्टोबर शुक्रवारी पहाटे नकुल भोईर यांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला ही घटना संशयास्पद वाटत नव्हती, मात्र पोलिसांनी कसून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना नकुलची पत्नी चैताली हिच्यावर संशय आला. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चैतालीने तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याला सोबत घेऊन नकुलची हत्या केल्याचे उघड झाले आहे. चिंचवड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सिद्धार्थ दीपक पवार यालाही अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नकुल भोईर हे पत्नी चैताली हिला मद्यपान न करण्याबद्दल, परपुरुषांसोबत फिरू नकोस आणि कर्ज काढू नकोस अशा गोष्टी वारंवार सांगत होते. याच गोष्टींचा राग मनात धरून चैतालीने नकुलच्या हत्येचा कट रचला आणि प्रियकराच्या मदतीने तिने नकुलचा जीव घेतला. चिंचवड पोलिसांच्या या जलद आणि अचूक तपासाने हत्येच्या घटनेमागील सत्य समोर आले असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, नकुल आणि चैताली या दाम्पत्याला दोन लहान मुलं आहेत. या हत्याकांडामुळे पाच आणि दोन वर्षांची मुलं पोरकी झाली आहेत.


COMMENTS