मुंबई: नवी मुंबईमधील वाशीतील सेक्टर 14 एम जी कॉम्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्य...
मुंबई: नवी मुंबईमधील वाशीतील सेक्टर 14 एम जी कॉम्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
दहाव्या मजल्यावर घरात एका आजीचा तर 12व्या मजल्यावरील घरात आई, वडील आणि 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. सदर दुर्घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्णन (वय 6), कमला हिरल जैन (वय 84), सुंदर बालकृष्णन (वय 44) आणि पुजा राजन (वय 39) यांचा समावेश आहे. तर अग्रवाल, जैन आणि घोष कुटुंबातील जखमी सदस्यांना हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी (ता. २०) मध्यरात्री 12.40 च्या सुमारास रहेजा रेसिडेन्सीमध्ये दहाव्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली आणि 11व्या आणि 12 व्या मजल्याला आगीने वेढले. या आगीने भीषण स्वरुप धारण केल्याने वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत नवी मुंबईतील कामोठे येथील सेक्टर 36 मध्ये आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीत ही आग लागली होती. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीमधील रुम क्रमांक 301 मध्ये ही आग लागली होती. तिसऱ्या मजल्यावरील घरात दोन सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. ऐन दिवाळीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे शोककळा पसरली आहे.


COMMENTS