सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आहे. डॉ. मुंडे यांनी टोकाचं पाऊल ...
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आहे. डॉ. मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधी आपल्या हातावर सुसाइड नोट लिहिली आहे.
या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात आणि फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
डॉ. मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी त्यांचा वाद झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, "माझ्यावर अन्याय होत आहे. मी आत्महत्या करीन." तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचे सहकार्यांकडून सांगण्यात येत आहे. अखेर काल रात्री डॉ. संपदा मुंडे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. या प्रकरणाची नोंद फलटण पोलिस ठाण्यात झाली असून, त्यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे.
घटनास्थळी तपासादरम्यान डॉक्टरांच्या हातावर लिहिलेली एक सुसाईड नोट आढळली. त्यात त्यांनी पोलिस PSI गोपाल बदने यांनी चार वेळा शारीरिक अत्याचार केल्याचा आणि पोलिस कर्मचाऱ्याने प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या खुलाशामुळे पोलिस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयात शोककळा पसरली असून, सहकाऱ्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. फलटणसह साताऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.


COMMENTS