नांदेड : एका युवकाने आपल्या जीवलग मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना नायगाव तालुक्यात घडली आहे. आरोपीने मित्राची क्रूरपणे हत्या केल्यानं...
नांदेड : एका युवकाने आपल्या जीवलग मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना नायगाव तालुक्यात घडली आहे. आरोपीने मित्राची क्रूरपणे हत्या केल्यानंतर दुचाकीतील पेट्रोल वापरून मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
पण गडगा कौठा रस्त्यावर अर्धवट जळालेल्या मृतदेह सापडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
शेख अब्बास शेख रमजानसाब असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. झिशान लतीफ सय्यद (वय १७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पत्नीवर वाईट नजर असल्याच्या संशयातून आरोपीने झिशानची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
डोंगरगाव येथील शेख अब्बास शेख रमजानसाब आणि त्याच गावातील सय्यद झिशान सय्यद लतीफ हे दोघे मित्र होते. सय्यद झिशान हा बारावीचे शिक्षण घेत होता. दोघंही मित्र असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. पण मागील काही काळापासून झिशानची आपल्या बायकोवर वाईट नजर आहे, असा संशय अब्बास याला होता. याच कारणातून मोहरमच्या दिवशी या दोघांमध्ये भांडण झाले होते, नंतर त्यांच्यातला वाद मिटला होता.
१ ऑक्टोबरला शेख अब्बासने सय्यद झिशानला सोबत नेल्याचे अनेकांनी पाहिले. त्यानंतर सय्यद झिशान घरी आला नव्हता. मृताच्या कुटुंबीयांनी शेख अब्बासकडे विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. २ ऑक्टोरला सकाळी झिशानचे वडील सय्यद लतीफ हे मुखेड पोलीस ठाण्यात गेले. त्या वेळी गडग्याजवळ युवकाचा मृतदेह सापडला, असे पोलिसांनी त्यांना सांगितले, तसेच मृताचे फोटोही दाखवले. फोटोवरून झिशानच्या वडिलांनी त्याची ओळख पटवली.
घटनास्थळी चप्पल, दगड आणि दारूच्या बाटल्या आढळल्या. संशयित शेख अब्बास याने झिशानला पार्टीसाठी नेले. झिशानच्या छातीवर चाकूने वार केला. नंतर झिशान कोसळताच त्याच्या डोक्यात दगड घातला. नंतर दुचाकीचे पेट्रोल काढून झिशानचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर येत आहे. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS