सातारा : फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात तपासादरम्यान विविध बाबी समोर येत आहेत. आत्महत्या केलेली डॉक्टर युवती आणि आरोपी...
सातारा : फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात तपासादरम्यान विविध बाबी समोर येत आहेत. आत्महत्या केलेली डॉक्टर युवती आणि आरोपी प्रशांत बनकर हे रिलेशनशिपमध्ये होते. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता, मात्र प्रशांतला डेंग्यू झाल्यानंतर दोघे पुन्हा संपर्कात आले होते.
मात्र, प्रशांतने लग्नास नकार दिल्याने डॉक्टर युवतीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
पोलिसांना तपासात असे उघड झाले आहे की, डॉक्टर युवती आणि प्रशांत बनकर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही महिन्यांनंतर त्यांच्यात वाद सुरू झाले आणि प्रशांत तिच्याशी संपर्क टाळू लागला. दोघांमध्ये झालेल्या फोन कॉल्स आणि व्हॉट्सअॅप मेसेजेसचे रेकॉर्ड्स पोलिसांनी हस्तगत केले आहेत. प्रशांत बनकर हा डॉक्टर युवती राहत असलेल्या घराच्या मालकाचा मुलगा आहे.
प्रशांत याला गेल्या महिन्यात डेंग्यू झाला होता. त्या काळात डॉक्टर युवती त्याच्याशी पुन्हा संपर्कात आली आणि दोघांचे नाते पुन्हा एकदा जुळले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत प्रशांत बनकर आणि निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला अटक केली आहे. बदनेविरुद्ध डॉक्टर युवतीच्या सुसाइड नोटमध्ये चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन या प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, 'डॉक्टर युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी आरोपी प्रशांत बनकर याला शेवटचा मेसेज पाठवला होता. मात्र, उपनिरीक्षक बदने याच्याशी तिचा संपर्क सहा महिन्यांपूर्वीच संपला होता. मृत डॉक्टर आणि उपजिल्हा रुग्णालय प्रशासन यांच्यात काही मतभेद होते. रुग्णालयातील तक्रार निवारण समिती आणि पोलिस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यातून डॉक्टरच्या बदलीची शिफारस झाली होती, मात्र त्यांनी तीन वेळा बदली नाकारली. त्यामुळे विशेष नियुक्तीद्वारे त्यांना फलटणमध्येच ठेवण्यात आले होते.'
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर युवती आणि प्रशांत बनकर यांच्यात फोटो काढण्यावरून किरकोळ वाद झाला होता. फोटो व्यवस्थित न आल्याने झालेल्या वादानंतर डॉक्टर घरातून बाहेर पडल्या आणि जवळच्या देवळात गेल्या. त्यानंतर बनकरच्या वडिलांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत आणले. यानंतर त्या एका हॉटेलवर गेल्या आणि आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकरला मेसेज पाठवला, मात्र त्याचा फोन त्या वेळी बंद होता. आत्महत्येपूर्वीच्या या मेसेजमधून अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता आहेत, असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.


COMMENTS