पुणे : पुणे शहरातील नवले पुलाजवळ मंगळवारी (ता. २८) पहाटे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने एकामागोमाग तीन वाहनांना जोरदार धडक...
पुणे : पुणे शहरातील नवले पुलाजवळ मंगळवारी (ता. २८) पहाटे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने एकामागोमाग तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन वाहनचालक किरकोळ जखमी झाले असून, तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.
कात्रज चौकाकडून फरश्या घेऊन नवले पुलाच्या दिशेने येणारा ट्रक चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक भरधाव वेगात पुढे गेला आणि रेडिमिक्स डंपर तसेच दोन कारला उडवत निघाला. धडक इतकी जोरदार होती की कार काही फूट पुढे ढकलल्या गेल्या आणि रस्त्याच्या मधोमध अडकल्या. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. सुदैवाने कोणत्याही वाहनचालकाचा जीवितहानी झाली नाही. मात्र, काही वाहनांचे गंभीर नुकसान झाले आहे. पोलिसांनी ट्रकचालक तौफिक इसरार अहमद (वय 32, रा. उत्तर प्रदेश) याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, नवले पूल परिसरात यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. या परिसरात सतत वाढणारी वाहतूक, ट्रकचा वेग आणि रस्त्यांची अरुंद रचना यामुळे हा परिसर 'ब्लॅक स्पॉट' म्हणून ओळखला जातो. नागरिकांनी अनेकदा येथे वाहतुकीवरील नियंत्रण वाढवावे अशी मागणी केली आहे.


COMMENTS