पुणे: मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात असलेल्या हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पा...
पुणे: मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात असलेल्या हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली.
मंगळवारी (ता. ३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
गौतमी पाटील हिच्या मालकीची एमएच 12 डब्ल्यू झेड 6589 या क्रमांकाच्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे (वय ४४, रा. धायरी) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेतली आणि मदतकार्य केले. रिक्षाचालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रिक्षाचालक प्रवासी घेण्यासाठी वडगाव बुद्रुक येथील हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर थांबले असताना, भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. याप्रकरणी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांचे मित्र युवराज ज्ञानोबा साळवे (वय 32) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गौतमी पाटील यांच्या मालकीच्या कारची रिक्षाला मागून एवढ्या जोरदार धडक बसली की रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. रिक्षाचालक मरगळे गंभीररित्या जखमी झाला आहे. तसेच अपघात झाला तेव्हा या रिक्षामध्ये दोन प्रवासी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे. धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अवघ्या काही तासात कारसह चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS