मुंबई : मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या एन्काऊंटरमध्ये रोहित आर्य याचा मृत्...
मुंबई : मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या एन्काऊंटरमध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना रोहित आर्य याने पोलिसांवर गोळीबार केला, या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही त्याच्यावर गोळीबार करावा लागला.
या गोळीबारामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या पवई भागातील एका स्टुडिओमध्ये रोहित आर्य याने 17 मुलांना ओलीस ठेवले होते. यानंतर पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेत या मुलांची सुटका केली आहे. पोलिसांनी बाथरूममधून मुलांना ओलिस ठेवलेल्या ठिकाणी प्रवेश केला. मुलांची सुटका करत असताना पोलिसांना गोळीबारही करावा लागला.
ही घटना पवईमधल्या आरए स्टुडिओमध्ये घडली. रोहित आर्य हा स्टुडिओमधलाच कर्मचारी आहे आणि तो एक युट्युब चॅनलही चालवतो. मागच्या चार ते पाच दिवसांपासून रोहित परिसरात ऑडिशन्स घेत होता. गुरूवारी सकाळी 100 मुले ऑडिशन्ससाठी आली तेव्हा त्याने 80 मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिली. पण 17 मुलांना आतच कोंडून ठेवले होते.
मुलांना कोंडून ठेवल्यानंतर रोहित आर्यने एक व्हिडिओ शेअर केला. ‘मी एक योजना आखली, मला काही लोकांसोबत बोलायचं आहे. माझ्या मागण्या मोठ्या आर्थिक नाहीयेत, तर नैतिक आहेत. मला प्रश्न विचारायचे आहेत आणि उत्तरे मिळवायची आहेत. मी दहशतवादी नाही. मी आक्रमक हालचाली करून चिथावणी देऊ शकतो. मला उत्तेजित करू नका’, असे रोहित आर्य त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणाला होता.


COMMENTS