मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार सध्या कोसळत आहे. याठिकाणी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. याच ...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार सध्या कोसळत आहे. याठिकाणी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. दोन दिवसांच्या पावसानंतर आणि मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाटोदा तालुक्यातील उखंड तलाव पूर्णपणे ओव्हरफ्लो झाला आहे. तर दक्षिण सोलापुरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे सीना नदीच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. औराद संजवाड पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. या पुलामुळे औराद परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसाच्या तडाख्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे.
बीड जिल्ह्यातील तलावातून पाणी मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहत आहे. या पावसामुळे पाटोदा तालुक्यातील तीन नद्यांना पूर आला आहे. नद्या दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उखंड तलाव ओसंडून वाहत असल्याची खास ड्रोनची दृष्ये समोर आली आहेत, ज्यात तलावाची सद्यस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात भूमिका मांडत मदतीची हाक मागितली आहे.
माझ्या कर्जत-जामखेड मतदारसंघात सर्वच गावांमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेली वेगळेगळी पिकं आता पाण्यात पोहत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. झालेलं नुकसान हे मोठं असल्याने आणि नुकसानग्रस्तांना तातडीने मदत व भरपाई देणं आवश्यक असल्याने या कामासह मदत व आपत्ती व्यवस्थापनाचं कामही प्रांताधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झालं पाहिजे. तसंच अनेक ठिकाणी रस्त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पावसाचा अंदाज घेऊन शाळांना सुट्टी देण्याबाबतही प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा.असं रोहित पवार म्हणाले आहेत.


COMMENTS