नांदेड: देगलूर तालुक्यातील शेळगाव येथे एका अल्पवयीन मुलाने आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणातून एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची धक्क...
नांदेड: देगलूर तालुक्यातील शेळगाव येथे एका अल्पवयीन मुलाने आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणातून एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपी मुलाला अटक केली आहे.
शेळगाव येथील ग्रामपंचायत परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. संतोष माटलवार असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. संतोष माटलवार हा त्याचा भाऊ आणि मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्याचवेळी गावातीलच एक अल्पवयीन मुलगा त्यांच्याजवळ आला. त्याने संतोषला ‘तू माझ्या बहिणीच्या पाठीमागे लागू नकोस,’ अशी धमकी दिली. यावेळी संतोषने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला.
हा वाद वाढत गेल्यानंतर चिडलेल्या आरोपीने आपल्याजवळील धारदार चाकूने संतोष माटलवारच्या गळ्यावर आणि पाठीवर प्राणघातक वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे संतोष रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. त्याच्यासोबत असलेल्या भावाने आणि मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर संतोषला मृत घोषित केले.
संतोषच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून या हत्येमागे बहिणीची छेडछाड केल्याचे कारण असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्ह्याची नोंद देगलूर पोलिसांनी घेतली आहे. हत्येचा आरोप असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS