हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव गावात जुन्या शेतजमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन जण गं...
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव गावात जुन्या शेतजमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
भांडेगाव येथील रहिवासी कुंडलिक जगताप आणि बाबाराव जगताप यांच्यात शेतीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. या वादामुळे त्यांच्यामध्ये सतत कुरबुरी होत होत्या. मंगळवारी (ता. २३) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कुंडलिक जगताप हे त्यांचा मुलगा शिवराज जगताप (वय 29), तसेच सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप यांच्यासोबत बाबाराव जगताप यांच्या घरी गेले.
कुंडलिक यांनी दरवाजा वाजवताच, बाबारावने दरवाजा उघडून त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या गोळीबारात कुंडलिक यांना तीन गोळ्या लागल्या, तर त्यांचा मुलगा शिवराज जगताप यांच्या छातीत गोळी लागली. या दोन्ही बाप-लेकांचा जागेवरच मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेले सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि तात्काळ तपास सुरू केला. या गोळीबारामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी बाबाराव जगताप, विठ्ठल जगताप आणि ज्ञानेश्वर जगताप या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.


COMMENTS