पुणे : पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात गॅंगवाराचा भडका उडाला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला टोळीने खून...
पुणे : पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात गॅंगवाराचा भडका उडाला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला टोळीने खून करूनच घेतला आहे. आंदेकर खुनातील आरोपीच्या मुलावर टोळीने पिस्तुलातून ११ गोळ्या झाडल्या.
त्यातील ३ गोळ्या लागून युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर (वय १८, रा. लक्ष्मी कॉम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ, पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील, (सर्व रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आयुष कोमकर याची आई कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. लक्ष्मी कॉम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


COMMENTS