पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पाडळी-तांबे या जिल्हा परिषद गटातून २००२ ते २००७ या पंचवार्षिक निवडणुकीत देवराम लांडे हे राष्ट्रवादी क...
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पाडळी-तांबे या जिल्हा परिषद गटातून २००२ ते २००७ या पंचवार्षिक निवडणुकीत देवराम लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पहिल्यांदाच निवडून आले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे एसटी प्रवर्गासाठी राखीव होते, त्यामुळे खेड तालुक्यातील अश्विनी मोरमारे यांचे नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निश्चित केले होते. राष्ट्रवादीकडून मोरमारे यांचे नाव अंतिम झाले होते.
जुन्नरमधून निवडून आलेले देवराम लांडे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तत्कालीन ज्येष्ठ आमदार वल्लभ बेनके यांनी आग्रह धरला होता. पण, अजितदादांनी खेडमधील अश्विनी मोरमारे यांचे नाव निश्चित केले होते. पण, बेनके यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बेनके यांनी मध्यरात्री भेट घेतली होती.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जुन्नरला न मिळाल्यास पक्ष सोडण्याचाही इशारा आमदार वल्लभ बेनके यांनी दिला होता. मध्यरात्रीपर्यंत जोरदार घडामोडी सुरू होत्या. अखेर आमदार बेनके यांच्या आक्रमकतेपुढे अखेर पक्षश्रेष्ठींनी माघार घेत अश्विनी मोरमारे यांच्याऐवजी जुन्नर तालुक्यातील देवराम लांडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षाचे नाव मध्यरात्री बदलण्यात आले.
दुसरीकडे, आपल्यासाठी आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे, याची साधी कुणकूणही देवराम लांडे यांना नव्हती. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी हेच देवराम लांडे हे जुन्नरहून एसटी बसने पुण्याला गेले होते. पुण्यात जिल्हा परिषदेत गेल्यानंतर लांडे यांना अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर लांडे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आणि त्यांची नियुक्ती झाली.
आदिवासी नेते देवराम लांडे यांना पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी तब्बल अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली. पण या आदिवासी नेत्याची अध्यक्षपदाची इनिंग वेगळ्याच कारणासाठी गाजली होती. आमदार वल्लभ बेनके यांच्या वरदहस्तामुळे अनपेक्षितपणे अध्यक्ष झालेले लांडे यांनी मात्र पुढील काळात बेनके यांना झटका दिला होता.
वल्लभ बेनके यांची साथ सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वल्लभ बेनके यांचे चिरंजीव माजी आमदार अतुल बेनके यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यामुळे लांडे यांच्या अध्यक्षपदासाठी ज्या वल्लभ बेनके यांनी प्रतिष्ठा पणाला लावली, त्या बेनकेंच्या विरोधात देवराम लांडे उभे राहिले होते.


COMMENTS