काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले,...
काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले, संसार पाण्यात गेले. नुकसानग्रस्त भागांची पाहणी नेत्यांकडून केली जात आहे.
अशातच अनेकांकडून अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जात आहे. राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य केले जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील पूर परिस्थितीचे भान राखून मदतीचा निर्णय घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक करुन आभार मानले.
महाराष्ट्रातील अनेक भागात मोठा पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. या परिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील सर्वच मंत्री विविध जिल्ह्यात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करुन पूरग्रस्तांना दिलासा देत आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन नागरिकांना दिलासा दिला आहे.
या परिस्थितीचे भान राखून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव आणि सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मराठवाड्यात झालेल्या या अतिवृष्टीचा फटका तेथील स्थानिक नागरिकांना तर झालाच पण हे सावट अद्याप संपलेले नसून पुढील ५ दिवसांत राज्यातील सर्वच भागात धुंव्वाधार पावसाचा इशारा आहे. बंगालच्या उपसागरात पुढील २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय स्थिती असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही भागात २४ ते २७ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील काही भागात आजपासून २९ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


COMMENTS