पुणे : पुणे पोलिस दलात लवकरच नवीन मोठी भरती होणार आहे. नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर गृह विभागाने यासाठी मंजुरी दिली आहे. पुणे शहराची भौगोल...
पुणे : पुणे पोलिस दलात लवकरच नवीन मोठी भरती होणार आहे. नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर गृह विभागाने यासाठी मंजुरी दिली आहे. पुणे शहराची भौगोलिक सीमा वाढल्यामुळे पोलिस दलावर कामाचा ताण अधिक वाढला आहे.
सध्या सुमारे 70 लाख लोकसंख्येसाठी साडेआठ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ज्यामुळे गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर ताण वाढत आहे.
पुणे पोलिसांनी आता आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती लवकरच 1,720 पदांच्या भरण्याचा शिक्का मोर्तब करणार आहे. ही पुणे पोलिस दलातील मागील काही वर्षांतील सर्वात मोठी भरती ठरणार आहे. नवीन भरतीसह कायद्याचे काटेकोर पालन आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. यासाठी पाच नवीन पोलिस ठाण्यांना गृह विभागाने मंजुरी दिली आहे. यामध्ये मांजरी, लोहगाव, येवलेवाडी, नऱ्हे आणि लक्ष्मीनगर ठाण्यांचा समावेश आहे. या ठाण्यांची स्थापना विद्यमान ठाण्यांपासून विभाजन करून केली जाणार आहे. उदाहरणार्थ कोंढावा पोलिस ठाण्यापासून येवलेवाडी पोलिस ठाणे, सिंहगड पोलिस ठाण्यापासून नऱ्हे पोलिस ठाणे, येरवडा पोलिस ठाण्यापासून लक्ष्मीनगर पोलिस ठाणे, विमानतळ पोलिस ठाण्यापासून लोहगाव पोलिस ठाणे आणि हडपसर पोलिस ठाण्यापासून मांजरी पोलिस ठाणे स्थापन होणार आहेत.
या भरतीत 830 नवीन पदांची निर्मिती होणार आहे तर उर्वरित पदे विद्यमान रिक्त जागांमधून भरली जातील. तसेच दोन नवीन परिमंडळांसाठीही मान्यता मिळाली आहे. यामध्ये दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, पाच वरिष्ठ निरीक्षक, पाच निरीक्षक आणि विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे. मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिल्यानंतर, उच्चाधिकार समिती लवकरच शिक्का मोर्तब करून अंतिम मान्यता देण्याची शक्यता आहे.


COMMENTS