नाशिक : जेलरोड-पवारवाडी परिसरात मुंबई-हावडा एक्स्प्रेससमोर उडी घेऊन एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
नाशिक : जेलरोड-पवारवाडी परिसरात मुंबई-हावडा एक्स्प्रेससमोर उडी घेऊन एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. युवकाचे वय अंदाजे २५ ते ३० असून युवतीचे वय २० ते २२ असल्याची माहिती आहे.
प्रेमीयुगुलाने जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी (ता. १३) मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या मुंबई-हावडा एक्स्प्रेसखाली हे दोघे सापडले. रेल्वेच्या धडकेमुळे दोघांच्याही मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले. रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या तपासणीत एकाच्या खिशात सिटीलिंक बसचे तिकीट सापडले. या तिकीटाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांच्या तपासानुसार, हे दोघे शुक्रवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेजे फाटा येथून बसने निघाले होते. त्यानंतर शनिवारी त्यांनी कारंजाहून नांदूर नाक्यामार्गे नाशिक रोडकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास केला. रात्री ९ च्या सुमारास ते सैलानी बाबा चौकात उतरले आणि त्यानंतर राजराजेश्वरीमार्गे पवारवाडी-एकलहरे गावाजवळील रेल्वेमार्गावर थांबले. त्यानंतर रात्री २ च्या सुमारास त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेमागे प्रेमप्रकरण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दोघांनीही हातात हात घालून जीव दिला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अद्याप मृतांची ओळख पटली नाही. पोलिस घटनेचा पुढील तपास करत असून, त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.


COMMENTS