बीड: एका सरकारी अधिकाऱ्याने मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यात घडली ...
बीड: एका सरकारी अधिकाऱ्याने मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यात घडली आहे. विलास डोंगरे (वय ५२) असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
ते बीड पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
विलास डोंगरे हे परळी शहरातील शिवाजीनगर भागात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. गुरुवारी सकाळी ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले होते. सकाळी साधारण ९ वाजताच्या सुमारास ते परत घरी आले. त्यानंतर ते आपल्या बेडरुममध्ये गेले. नेहमीप्रमाणेच ते लवकर बाहेर येतील अशी अपेक्षा कुटुंबियांना होती. मात्र, बराच वेळ होऊनही ते खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबियांना काहीतरी शंका आली.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास, त्यांच्या कुटुंबियांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता, विलास डोंगरे यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ आरडाओरडा केला आणि आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले. त्यांना खाली उतरवून तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. विलास डोंगरे यांनी नेमक्या कोणत्या कारणाने टोकाचे पाऊल उचलले, हे स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे पोलिस सध्या त्यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवत असून, पुढील तपास करत आहेत.


COMMENTS