काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरुणाईने आज (सोमवार) सरकारविरोधात संसद परिसरात जाऊन आंदोलन केले. 18 आंदोलनकर्...
काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरुणाईने आज (सोमवार) सरकारविरोधात संसद परिसरात जाऊन आंदोलन केले. 18 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला असून, काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटरसह 26 सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे.
नेपाळमध्ये हजारो Gen-Z मुले-मुली सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले असून, संसदेत प्रवेश केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याची फवारणीही केली. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ सरकारने आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे. पोलिसांनी काठमांडूमध्ये आज रात्री 10 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. काठमांडूमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. नेपाळ पोलिसांच्या मते, 12 हजारांहून अधिक निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी संसदेच्या गेट क्रमांक 1 आणि 2 वर कब्जा केला. संसद भवनासोबतच, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाजवळ सैन्य तैनात करण्यात आले आहे.
नेपाळ सरकारने 3 सप्टेंबर रोजी फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. हे प्लॅटफॉर्म नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणीकृत नव्हते. मंत्रालयाने त्यांना 28 ऑगस्टपासून 7 दिवसांची मुदत दिली होती. त्याची अंतिम मुदत 2 सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर नेपाळ सरकारने 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली.
नेपाळमध्ये बंदी घालण्यात आलेले ऍप्स पुढील प्रमाणे…
मेटा प्लॅटफॉर्म: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप.
व्हिडिओ आणि इमेज शेअरिंग: यूट्यूब, स्नॅपचॅट आणि पिंटरेस्ट.
व्यावसायिक नेटवर्किंग: लिंक्डइन.
बातम्या आणि सोशल नेटवर्किंग: एक्स (पूर्वी ट्विटर) आणि रेडिट.
इतर प्लॅटफॉर्म: डिस्कॉर्ड, सिग्नल, थ्रेड्स, वीचॅट, क्वोरा, टम्बलर,
क्लबहाऊस, मास्टोडॉन, रंबल, मीवी, व्हीके, लाइन, इमो, झालो, सोल, बोटिम आणि हॅम्रो पॅट्रो.
मेसेजिंग अॅप्स: ऑनलाइन फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या चिंतेमुळे जुलै 2025 मध्ये टेलिग्रामवर देखील बंदी घालण्यात आली होती.


COMMENTS