पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ मंगळवारी (ता. ५) सायंकाळी काही युवकांनी मिळून एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. युवक गंभीर जखमी झाल...
पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ मंगळवारी (ता. ५) सायंकाळी काही युवकांनी मिळून एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
दोन युवक जात असताना काहीजण पाठलाग करत असल्याचे समजल्यानंतर दोघे झेड ब्रीजजवळ उभे राहिले. त्याचवेळी पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या पाच ते सहा जणांनी या दोघांवर थेट कोयत्याने हल्ला केला. यावेळी स्कूटीवरील दोघांनी प्रतिकार करण्याचा आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण याच ठिकाणी दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी दुसरा हल्ला करत युवकाला रक्तबंबाळ केले. यावेळी काही हल्लेखोरांनी कोयत्याने वाहनाची तोडफोड केली. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा हल्ला नियोजित पद्धतीने केल्याचे दिसत आहे. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जुन्या वादाच्या कारणातून हा प्राणघातक हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पाच ते सहा जणांच्या एका टोळक्याने हातात कोयते घेऊन दहशत माजवली. त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी पाच ते सहा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात अशा प्रकारे खुलेआम दहशत माजवली जात असल्याने नागरिकांमध्ये घबराहाट पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS