पुणे पोलिसांनी तीन युवतींचा छळ केल्याचा आरोप पुणे शहरातील कोथरुड पोलिस ठाण्यात तीन युवतींना पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनीच त्यांचा मानसिक आण...
पुणे पोलिसांनी तीन युवतींचा छळ केल्याचा आरोप पुणे शहरातील कोथरुड पोलिस ठाण्यात तीन युवतींना पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनीच त्यांचा मानसिक आणि छळ केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी चौकशी करण्याच्या नावाखाली तीन युवतींना ताब्यात घेतल्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण करत, जातीवाचक शिवीगाळ केली.शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी या घटनेची दखल घेतली असून, या प्रकरणातील आरोपी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोथरुड परिसरातील हे प्रकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेल्या एका मिसिंग कम्प्लेंटशी संबंधित आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. या पीडित विवाहितेला या तीन मुलींनी मदत केली होती. पुण्यात तिला राहायला आसरा दिला होता. विवाहित महिला घरातून गायब झाली, तेव्हा संभाजीनगरमध्ये याबाबत मिसिंग तक्रार दाखल
करण्यात आली होती.
संभाजीनगर पोलिसांनी या मिसिंग तक्रारीचा तपास केला, तेव्हा त्यांना विवाहितेचं लोकेशन पुण्यातील कोथरुड भागात असल्याचे आढळून आले. यानंतर स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता संबधित तीन मुलींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिस ठाण्यात आणून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलिस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
कोथरुड पोलिस ठाण्यातील पीएसआय प्रेमा पाटील या मुलींना म्हणाल्या की, 'तुम्ही महार-मांगाचे ना, मग तुम्ही असचं वागणार आहे, तुम्ही वाया जाणार आहात. तुमची जात अशीच आहे, तू किती पोरांसोबत झोपलीस, असे प्रेमा पाटील यांनी म्हटल्याचा आरोप आहे. छत्रपती संभाजीनगरचे पीएसआय कामटे यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. एका मुलीने पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर पीएसआय कामटे संतापले. या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे स्कार्फ सेम आहेत, मग तुम्ही लेस्बियन आहात का? तुम्ही दोघीही दिसताही तशाच. तुम्ही किती तोकडे कपडे घालता. तुम्ही दारु पीत भटकत असाल. तुला बाप नाही तर तुला तर सोडूनच दिलं असेल, असे कामटे यांनी म्हटल्याचा आरोप आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, यासाठी या युवती पोलिस आयुक्तालयात बसून आहेत. जोपर्यंत पोलिसांवर योग्य ती कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या तीन मुलींच्या आंदोलनाला आता पुण्यातील इतरही सामाजिक कार्यकर्त्यांचा समर्थन मिळत आहेत. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणात तथ्य असेल तर कारवाई करू असं सांगितल आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस उपयुक्त संभाजी कदम हे या प्रकरणी काय कारवाई करतात पाहावे लागेल.
दरम्यान, या घटनेनंतर सध्या पुण्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, रोहित पवार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलिस आयुक्तालयात ठाण मांडून होते. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करावा, यासाठी या सगळ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु, पुणे पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता या मुलींना पत्र देत गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली.


COMMENTS