बीड: वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराने व्यक्तीला दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावस...
बीड: वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराने व्यक्तीला दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असणारे राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये 10 टक्के व्याजाने उसने घेतले होते. याची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिनाप्रमाणे करण्यात आली. मात्र, पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता. तुझ्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, असे म्हणत सावकाराने राम फटाले यांचा मानसिक छळ केला. वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यांनी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सावकार डॉ. लक्ष्मण जाधव आणि त्याच्या पत्नीसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल असून तिघेजण अटकेत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
राम फटाले यांचे डोळ्यात पाणी आणणारं पत्र पुढीलप्रमाणे…
प्रिय आई आणि पप्पा
सुजय, गौरी आणि रेणुका
मी चांगला मुलगा, पती आणि वडील होऊ शकत नाही. तरी मला माफ करा. रेणुका तुला माझी जागा घेऊन माझे आई-वडील, सुजय आणि गौरी यांची काळजी घ्यावी लागेल. शाम भाऊ लखन माझे मुले आणि बायको, आई-वडील यांना सांभाळा. मला माफ करा, तुम्हा सर्वांचा राम.
माझे आई-वडील यांच्याकडे माझ्या मातीसाठी पैसे नाहीत. माझी माती समाजाकडून वर्गणी काढून करावी. माझं दहावं, तेरावं आणि चौदावं करु नका. माझं वर्षश्राद्ध करु नका, ही माझी इच्छा आहे. रेणुका मी तुझ्यावर माझ्या परिवाराची जबाबदारी देऊन जात आहे. तुला यापुढे खंबीरपणे सर्वांशी झगडावे लागेल.
तुझा राम
राम फटाले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना लिहलेल्या पत्रात गंभीर आरोप पुढीलप्रमाणे…
मी आत्महत्या करण्यास कारणीभूत असलेली व्यक्ती डॉ. लक्ष्मण जाधव व त्यांची पत्नी वर्षा जाधव आहेत. त्यांनी मला मानसिक त्रास दिला व माझा छळ केला. मी त्यांच्याकडून व्याजाने उसने रुपये घेतले होते. मी त्यांना रक्कम परत केली होती. पण माझे चेक बोर्ड परत दे म्हणालो अजून रक्कम दे. माझे बँक खाते, पत्नी आणि मुलीचे बँक खाते बँक ऑफ बडोदामध्ये आहे. साहेब त्यांच्याकडून सर्व रक्कम परत घेऊन माझ्या परिवाराला परत देण्यात यावी, ही नम्र विनंती. गेल्या सहा-सात वर्षांपासून मी त्यांना रक्कम देत आहे. तरी माझे बँक खाते तपासून रक्कम परत देण्यात यावी. ही आपणास विनंती.


COMMENTS