सोलापूरः पंढरपूरमधील मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथील एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्य...
सोलापूरः पंढरपूरमधील मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथील एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. चित्रपटाला शोभेल अशा रीतीने एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिसांनी त्यांच्या कौशल्याने हा सर्व बनाव उघडा केला आहे.
पोलिसांनी विवाहित महिला व तिच्या प्रियकराला गजाआड केले असून, पुढील तपास करत आहेत.
चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची थरारक आणि ट्विस्टपूर्ण घटना मंगळवेढ्यात घडली. मंगळवेढ्यातील पाटकळ मध्ये एका विवाहित महिलेचा कडब्याच्या गंजीत जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. घरातील विवाहित सुनेनेच आत्महत्या केल्याचे सर्वांना वाटले. यानंतर या मुलीचे माहेरकडील कुटुंबीय या ठिकाणी दाखल झाले. आपल्या मुलीची आत्महत्यानसून तिची हत्या झाल्याचा आरोप विवाहितेच्या कुटुंबाने पोलिसांकडे केला. पोलिसांनी तपास सुरू करताना त्यांना ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय आला. शिवाय, विवाहितेचा फोन तिच्या अंगावर जळालेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला. या फोनची सीडीआर चेक केल्यानंतर त्यांना एका युवकावर संशय आला. पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. सुरुवातीला या प्रियकराने आपणच या विवाहितेची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळी घेऊन जाऊ लागले असता त्याने पुन्हा घटनेची खरी कबुली देताना ज्या विवाहितेची हत्या झाली आहे ती मेलेली नसून जिवंत असल्याचे सांगितले. यानंतर या प्रियकरास त्या विवाहितेला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितल्यावर दुसऱ्या बाजूने ती विवाहिताच बोलू लागली आणि पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी तातडीने हा प्रियकर आणि कराड येथे गेलेली ती विवाहिता यांना ताब्यात घेतले आणि संपूर्ण खुनाचा उलगडा झाला.
पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांच्या पत्नी किरण राहत होते. 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरण (वय २३) या विवाहितेने आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याचे चित्र निर्माण केले. यानंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नीच्या मृत्यूनंतर रडत होता. त्याचवेळी किरणचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले. किरणच्या वडिलांनी पोलिसांना आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्याची विनंती केली. किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. विवाहिता किरण सावंत आणि तिचा प्रियकर निशांत सावंत (वय २०) यांचे काही महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. विशेष म्हणजे या विवाहितेला दोन वर्षांची मुलगी देखील आहे. आपण दोघे कायमचे पळून जायचे असे या दोघांनी ठरवले आणि खुनाची स्टोरी रचली गेली. यामध्ये किरण हिने आत्महत्या केल्याचा बनाव रचायचा यासाठी गवताच्या गंजीत पेटवून मृत्यू झाल्याचे दाखवायचे असे ठरले. मात्र यासाठी कोणाचातरी मृतदेह यात असणे आवश्यक असल्याने किरण आणि निशांत यांनी बेवारस वेडसर महिलेचा शोध सुरू केला.
पंढरपूरच्या गोपाळपूर जवळ एक वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत असल्याचे निशांत याला दिसले. यानंतर त्याने तिला तिच्या मुलाला शोधून देतो असे सांगून पाटकळ येथील सावंत वस्ती येथे घेऊन आला. यानंतर दोन दिवसापूर्वी तिचा गळा दाबून खून करून घटने दिवशी या गवताच्या गंजीत तिचा मृतदेह ठेवला आणि गवताची गंजी पेटवून दिली. यावेळी त्यांनी किरणचा मोबाईल या मृत महिलेच्या अंगावर ठेवला. रात्री अडीचच्या सुमाराला गवताची गंजी पेटवण्यापूर्वी किरण हिला घरातून बाहेर बोलवून डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितले. यानंतर गंजी पेटवून निशांत निघून गेला. गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्याने किरण हिनेच आत्महत्या केली असे कुटुंबाला वाटले. मात्र किरणच्या वडिलांना संशय आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि या जळालेल्या मोबाईलवरून पोलिसांना संशय वाढला. सुरुवातीला पतीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना यात त्याचा हात नसल्याचे दिसले. नंतर या मोबाईल सीडीआरवरून निशांतपर्यंत पोलिस पोहचले आणि निशांतने किरणच्या मदतीने केलेल्या या खून प्रकरणाचा उलगडा केला. सध्या विवाहिता किरण आणि निशांत पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनी प्रेमासाठी एका निष्पाप वेडसर महिलेची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून, पुढील तपास करत आहेत.


COMMENTS