जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे चौथी इयत्तेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, पहिली इयत्तेत नव्याने दाखल होणाऱ्या बालगोपाळांचे स्वागत ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे चौथी इयत्तेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, पहिली इयत्तेत नव्याने दाखल होणाऱ्या बालगोपाळांचे स्वागत सोहळा, तसेच अंगणवाडी सेविका सुलोचना डोके यांचा निरोप समारंभ , पुस्तक प्रकाशन, वाढदिवस,चावडी वाचन अशा विशेष कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या सोहळ्याला ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरामण डोके (चेअरमन) होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास डोके (माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य), अनिल डोके (शा.व्य.स. उपाध्यक्ष), सत्यवान डोके पी डी सी बँक से.नि.अ, शिवाजी डोके (कृ.सो. शि. बु. संचालक व हरिश्चंद्र बाबुराव डोके शाळा जागा मालक), आशीष डोके, सुलोचना डोके (माजी अंगणवाडी सेविका), हर्षदा डोके (अंगणवाडी मदतनीस), सुवर्णा डोके (शा.व्य.स. सदस्य), हिना इनामदार, माता-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमात चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपले शालेय अनुभव अतिशय भावनिक भाषणांमधून व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शाळेस बॅडमिंटन व क्रिकेटचे साहित्य भेट देत आपले ऋण व्यक्त केले. चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांचे संकलन करून भावरंग बालमनाचे नावाचा एक काव्यसंग्रह तयार करण्यात आला, जो शिक्षक यशवंत घोडे यांनी संपादित केला असून तो याच कार्यक्रमात शाळा स्तरावर प्रकाशित करण्यात आला.
या कार्यक्रमात सुलोचना डोके यांचा सेवाविषयक गौरव करण्यात आला. त्यांनी निवृत्तीनंतरही अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य सुरू ठेवले. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांना सन्मानपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पहिली इयत्तेत दाखल होणाऱ्या 10 बालकांचे गुलाबपुष्प व बालमित्र पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षणाच्या प्रवासात पहिले पाऊल टाकणाऱ्या या चिमुकल्यांसाठी हा आनंदाचा क्षण ठरला.
कार्यक्रमाच्या विशेष भागात शिक्षक यशवंत घोडे यांचा सन्मानही करण्यात आला. त्यांच्या "अवती भवती" या बालकाव्यसंग्रहाची निवड समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात झाली असून, हे पुस्तक राज्यातील अनेक शाळांमध्ये पाठवले गेले आहे. या यशाबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी नयन दत्तात्रय डोके या चिमुकल्याचा वाढदिवसही आनंदात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे चावडी वाचन घेण्यात आले आणि कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्याम लोलोलापोड सरांनी तर आभार प्रदर्शन यशवंत घोडे सरांनी केले. शेवटी मान्यवरांनी आपापल्या भाषणातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व शाळेच्या उत्तम कामगिरीचे कौतुक केले.
COMMENTS