शनिवार दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद श्री गणेश चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री...
शनिवार दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद श्री गणेश चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाद्रपद श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. दिवसभरात असंख्य भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वाजता देवस्थानचे वतीने महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत मंदिरात ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर भाविक भक्तांकरीता देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने व देवस्थानचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गिरीजात्मज गणेशाचे मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाचे नैवेद्याकरीता मुंबई येथील फळांचे व्यापारी राम मारुती कोकणे यांनी विविध प्रकारची फळे दिली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्या वतीने केले होते. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
COMMENTS