धाराशिव: शेतरस्त्याच्या अंतिम निकालावर तहसीलदारांची स्वाक्षरी घेऊन निकालाची प्रत देण्यासाठी शेतकऱ्याला दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या धाराश...
धाराशिव: शेतरस्त्याच्या अंतिम निकालावर तहसीलदारांची स्वाक्षरी घेऊन निकालाची प्रत देण्यासाठी शेतकऱ्याला दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या धाराशिव तहसील मधील महिला महसूल सहायक स्वाती खताळ यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई केली आहे.
खताळ यांनी लाच मागितली पण एसीबीने सापळा लावल्याचा संशय आल्याने लाच स्वीकारली नाही. मात्र, लाच मागणे गुन्हा असल्याने खताळ यांच्याविरुद्ध एसीबीने कारवाई केली आहे.
धाराशिव तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात शेतरस्ता मिळावा म्हणून प्रकरण दाखल केले होते. प्रकरण चालवल्यानंतर अंतिम निकाल देण्यात येणार होता. हा निकाल टंकलिखित झाल्यानंतर त्यावर तहसीलदारांची स्वाक्षरी घेऊन निकालाची प्रत देण्यासाठी यापूर्वीच १० हजार रूपये लाचेची मागणी झाली होती. महसूल सहायक स्वाती ज्योतीराम खताळ यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे १० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे २१ जून, २६ जून व १७ जुलै रोजीच्या रेकॉर्डिंगच्या पुराव्यांवरून समोर आले आहे. एसीबीच्या पथकाने सापळा लावल्याचा संशय आल्याने स्वाती खताळ यांनी लाच मागितली, पण स्वीकारली नाही. याप्रकरणी महसूल सहायक स्वाती खताळ यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात १८ जुलै रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलिस निरीक्षक सापळा अधिकारी विकास राठोड, पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, विष्णू बेळे, सचिन शेवाळे यांच्या पथकाने केली.
आरोपी महिलेचा शिपाई ते लिपिक प्रवास...
स्वाती खताळ या २०१० मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून रूजू झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात त्यांनी शिपाई म्हणून काही वर्षे काम केले. त्या नंतर त्यांची पदोन्नती महसूल सहायक म्हणून झाल्यानंतर त्या धाराशिव तहसील कार्यालयात रूजू झाल्या. त्यांच्याकडे शेतरस्ते सुनावण्यासंदर्भात कामकाज होते.
COMMENTS