बीड: युवकाच्या धमक्यांना कंटाळून युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनीषा परमेश्वर घुले (वय 19) असे आत्महत्या कर...
बीड: युवकाच्या धमक्यांना कंटाळून युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनीषा परमेश्वर घुले (वय 19) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. वैभव रामराज मुंडे असे धमक्या देणाऱ्या युवकाचे नाव आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत. आठ दिवसांवर साखरपुडा आला असताना मनीषाने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोठारबन (ता. वडवणी) येथील मनीषा घुले हिने गावातीलच युवकाच्या धमक्यांना कंटाळून राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मनीषाचे 23 तारखेला साखरपुडा आणि 28 जुलै रोजी लग्न होणार होते. परंतु, गावातील तरुण वैभव मुंडे हा मनीषाला 'माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर तुझी बदनामी करेन' अशा धमक्या लग्न जमल्यापासून देत होता. अखेर त्याच्या धमक्यांना कंटाळून मनीषाने आत्महत्या केली.
आई-वडील शेतात गेल्यावर मनीषाने सकाळी 11 वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा आतमधून बंद करुन घेतला. त्यानंतर घरातील फॅनला गळफास घेत जीवन संपवले. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमन सिरसट यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चिंचवण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी मुलीचे वडील परमेश्वर बजरंग घुले यांच्या तक्रारीवरुन वैभव मुंडे याच्यावर शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वैभव मुंडे फरार झाला आहे. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिस पथक नियुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, मनिषाचे लग्न जमल्यानंतर घरात लग्न कार्याची तयारी सुरु होती साखरपुड्याची खरेदी देखील झाली होती. परंतु, मनीषा ही वैभवच्या धमक्यांना घाबरली होती. आपले लग्न मोडते की काय, अशी तिला भीती वाटत होती. या भीतीमुळेच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS