सातारा : 'सॉरी दादा मी या आयुष्याला वैतागलोय' सगळीकडून मी अडकत चाललो आहे. याच्यापुढे तुम्हाला सगळ्यांना त्रास नको व हा मेसेज कोणाला ...
सातारा : 'सॉरी दादा मी या आयुष्याला वैतागलोय' सगळीकडून मी अडकत चाललो आहे. याच्यापुढे तुम्हाला सगळ्यांना त्रास नको व हा मेसेज कोणाला दाखवू नको. डीलीट कर.
पप्पांना सॉरी सांग, असा मेसेज मोठ्या भावाला करून धाकट्या भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. १५) महाबळेश्वर येथे उघडकीस आली.
किरण दत्तात्रय शिंगरे (वय २२, रा. मेटतळे, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. महाबळेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मेटतळे गावातील गणेश दत्तात्रय शिंगरे (वय ३२) याचा लहान भाऊ किरण शिंगरे हा काम नसल्यामुळे घरीच असायचा. मंगळवारी रात्री नऊ वाजता किरण हा त्याच्या खोलीमध्ये नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेला. शेजारच्या खोलीमध्ये त्याचा मोठा भाऊ गणेश हा झोपण्यासाठी गेला होता. सकाळी सहा वाजता गणेशला जाग आली. त्यावेळी त्याने व्हाँट्सअँप पाहिले असता त्याच्या लहान भाऊ किरणने त्याला मेसेज पाठविल्याचे दिसले.
किरण याने मेसेज रात्री पावणेबारा वाजता व्हॉट्सअँपवर पाठविला होता. मेसेजमध्ये लिहिले होते, 'सॉरी दादा मी या आयुष्याला वैतागलोय. सगळीकडून मी अडकत चाललो आहे. याच्यापुढे तुम्हाला सगळ्यांना त्रास नको व हा मेसेज कोणाला दाखवू नको. डीलीट कर. पप्पांना सॉरी सांग. मी मोबाइल अँपवरून ऑनलाइन लोन घेतलेले असून, ते मला फेडता येत नाही. ते सकाळी अकरा वाजायच्या आत भरून टाक. माझी शपथ आहे. कोणाला सांगू नको. मिस यू,' छोट्या भावाचा मेसेज पाहून मोठा भाऊ त्याच्या रूमकडे तो धावत गेला. जोर-जोरात हाक मारली व दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा दरवाजा आतून बंद होता.
गणेशने आरडाओरड करत घरातील सर्वांना हाक मारली. तसे सगळेजण झोपेतून जागे झाले. व्हॉट्सअँपवरील मेसेज त्याने त्यांना दाखविला. सर्वांनी मिळून किरणच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा उघडत नव्हता म्हणून सर्वांनी मिळून तो दरवाजा अखेर तोडला. त्याच्या खोलीमध्ये त्यांनी प्रवेश केला असता घरातील अँगलला नायलॉनच्या रस्सीने किरणने गळफास घेतल्याचे दिसून आले. गणेश आणि त्याच्या शेजारील लोकांनी घरातील कोयत्याच्या साह्याने गळफासाची रस्सी कापून त्याला खाली उतरवले. किरणचा मृतदेह महाबळेश्वरमधील ग्रामीण रुग्णालय नेण्यात आला.
किरणच्या मृतदेहाचे दुपारी शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळी सहा वाजता मेटतळे गावात किरणवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह मित्रांनी हाटो फोडला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS