पु णेः पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) जवळ आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर म...
पुणेः पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) जवळ आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश असून, मोटारचालक गंभीर जखमी झाला आहे.
सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. चालक अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कारेगाव मधील खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका मोटारीतून (क्र. एमएच १२ ईएम २९७८) चाकणकडे चालले होते. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनर (क्र. एमएच ४३ बीजी २७७६) वर त्यांची मोटार जोरात जाऊन आदळली. यावेळी झालेल्या अपघातात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ब्रह्मा पवार, संतोष औटी, विलास आंबेकर या पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने कंटेनरखाली घुसलेली मोटार बाहेर काढली व स्थानिक युवकांच्या मदतीने जखमी व मृतांना बाहेर काढले. या अपघाप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर चालक बबलू लहरी चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
COMMENTS