पुणे : आजीच्या शरीराचे कटरने नऊ तुकडे करून नदीत टाकल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये उघड झाले आहे. मुंढवा पोलिसांनी कसून चौकशी करीत हा गु...
पुणे : आजीच्या शरीराचे कटरने नऊ तुकडे करून नदीत टाकल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये उघड झाले आहे. मुंढवा पोलिसांनी कसून चौकशी करीत हा गुन्हा उघडकीस आणला असून नातू आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.
या घटनेमळे पुणे हादरले आहे.
घर सोडून जाण्यास सांगितले आणि दागिन्यांचा ताबा न दिल्याच्या रागातून २० वर्षांच्या नातवाने वडिलांच्या मदतीने आजीचा खून केला आहे. हा प्रकार मुंढवा परिसरात घडला आहे. नातवाने आजीच्या शरीराचे तुकडे करून नदीत टाकले होते. पण, मुंढवा पोलिसांनी कसून चौकशी करीत हा गुन्हा उघडकीस आणत नातवाला आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा गायकवाड (वय ६२, रा. म्हसोबानगर, मुंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. साहिल ऊर्फ गुड्डु संदीप गायकवाड (वय २० रा. म्हसोबानगर, मुंढवा) आणि संदीप गायकवाड (वय ४२, रा. गुरुकृपा सोसायटी, लक्ष्मी इन्क्लेव्ह, केशवनगर, मुंढवा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. साहिल याने आजीचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह कासेवाडी झोपडपट्टी भवानीपेठ येथे घेऊन गेला. आजीच्या जुन्या घरी कुणी राहत नसल्याने तिथे इलेक्ट्रीक कटर आणून त्याच्या साह्याने मृतदेहाचे तब्बल ९ तुकडे केले आणि गोणीत भरून खराडीच्या बाजूने जाऊन नदीत टाकून दिले. मुसळधार पाऊस आणि नदीला पाणी असल्याने ही घटना कुणाच्या लक्षात आली नाही. मात्र तपासपथकातील पोलिस संतोष जगताप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर तपास केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
मृतदेहाचा केवळ पाय नदीतून बाजूला पडलेला सुमारे २० किमी दूर लोणी काळभोर पोलिसांना मिळून आला. त्याची डीएनए चाचणी केल्यावर तो पाय उषा गायकवाड यांच्या मृतदेहाचा असल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी खुनाचं कलम वाढवले आहे. याप्रकरणी शीतल मनोज कांबळे (वय ४०, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नातू आणि वडिलांना अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
COMMENTS