पुणेः सासवड-वीर रस्त्यावर शुक्रवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील नव विवाहित जोडप्य...
पुणेः सासवड-वीर रस्त्यावर शुक्रवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील नव विवाहित जोडप्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शिवाय, एक सात वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पाऊस व वादळ जोरात सुरू होते. रेनुकेश गुणशेखर जाधव (वय २९) व त्यांची पत्नी सारिका रेनुकेश जाधव (वय २३) आणि त्यांची भाची ईश्वरी संदेश देशमुख हे सासवडहून परिंचेकडे मोटार सायकलवरून निघाले होते. पिंपळे येथून जात असतांना रस्त्या शेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची भाची (बहिणीची मुलगी) गंभीर जखमी झाली. घटने नंतर परिसरातील नागरीक मदतीला धावले.
पोलिसानी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्थांना सासवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पण, तो पर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. तर मुलगी बेशुध्द अवस्थेत असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. रेनुकेश जाधव हा पिरींचे येथील पत्रकार गुणशेखर जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता तर रेनुकेश आणि सारिका यांचा चार महिन्या पूर्वीच विवाह झाला आहे. या घटने मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS