देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळानं घात घातला. प्रसिद्ध राघवेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी कर्नाटकहून निघालेल्या भाविकांच्या बोलेरो गाडीला...
देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळानं घात घातला. प्रसिद्ध राघवेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी कर्नाटकहून निघालेल्या भाविकांच्या बोलेरो गाडीला एका लॉरीने धडक दिली. या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
रस्त्यावर अक्षरश: रक्ताचा सडा आणि मृतदेह पडले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भाविक बोलेरो गाडीने दर्शनासाठी जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकची आणि बोलेरोची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बोलेरो गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आणि ८ प्रवाशांनी जागीच मृत्यू झाला.
कुठे झाला भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात मंत्रालयम मंडळातील चिलकलदोना गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकच्या चिक्कमगाळुरू भागातील काही भाविक बोलेरो गाडीने मंत्रालयाकडे दर्शनासाठी जात होते.
१२ जण जखमी झाल्याची माहिती
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या १० ते १२ जणांना तात्काळ एममिगनूर इथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिले अपघाताचे अपडेट्स
कुर्नूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत हे कर्नाटक राज्यातील चिक्कमगाळुरू परिसरातील रहिवासी आहेत. दर्शनाच्या ओढीने निघालेल्या या भाविकांचा प्रवास अशा प्रकारे अर्धवट आणि दुर्दैवी ठरेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. या घटनेमुळे चिक्कमगाळुरू आणि मंत्रालया परिसरातील भाविकांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.


COMMENTS