गुन्हेगारी जगत, खून प्रकरणं, मारहाण यामुळे बीड जिल्हा हा राज्याच्या केंद्रस्थानी आला. वाल्मिक कराडची प्रकरणं समोर आल्यानंतर या जिल्ह्यात काय...
गुन्हेगारी जगत, खून प्रकरणं, मारहाण यामुळे बीड जिल्हा हा राज्याच्या केंद्रस्थानी आला. वाल्मिक कराडची प्रकरणं समोर आल्यानंतर या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला. दरम्यान, सध्या वाल्मिक कराड हा तुरुंगात आहे. त्याची टोळीदेखील तुरुंगात आहे. परंतु त्याची दहशत अजूनही कायम आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण नुकतेच किरकोळ कारणावरून वाल्मीक कराडचा समर्थक सफवान खानने गोळीबार केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ कारणावरून दोन गटातील तरुणांमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी एका तरुणाने फोन करून सफवान खान याला बोलावून घेतले.
त्याने गाडीतून उतरताच थेट गोळीबार करायला सुरुवात केली, असे म्हटले जात आहे. पीडीत सरोज खान, जरीफ खान हे या प्रकरणात पीडित आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार सफवान खानने त्यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. यापूर्वी देखील त्याने राडा केला होता, अशी माहिती या पीडितांनी दिली आहे. तसेच त्याला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी संबंधित पीडितांनी केली आहे.
दरम्यान कराडचा समर्थक सफवान खान याच्या अनेक रिल्स आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये तो हातामध्ये बंदूक घेऊन फिरत असल्याचे दिसत आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात देखील तो कराडचा फोटो घेऊन पुढे चालत असल्याचे समोर आले होते. वाल्मिक कराड सोबतही त्याच्या काही रील व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अवैध शस्त्रांसोबतच्या रील व्हायरल करून तो दहशत माजवत असल्याचे दावा केला जातोय. या गोळीबारानंतर पुन्हा एकदा बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडमध्ये नेमकं काय चाललंय? तेथील पोलीस यंत्रणा नेमकी काय करत आहे? असेही बोलले जात आहे.


COMMENTS