ठाणे येथील जांभळी नाका परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये 23 वर्षाच्या तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ...
ठाणे येथील जांभळी नाका परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये 23 वर्षाच्या तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपी नंदकिशोर गाडेकर (वय 27) याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उशीने तोंड दाबून या तरुणीची हत्या केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
खोलीत जाऊन बघितलं, तर...
मुंबईतील भांडुप परिसरात मृत तरुणी राहत होती. डोंबिवलीत राहणारा आरोपी नंदकिशोर हा काल मंगळवारी दुपारी 3 वाजता जांभळी नाका येथील हॉटेल महाराजा लॉजमध्ये काही तासासाठी राहण्यास आला होता. त्याने सोबत असलेल्या 23 वर्षाच्या तरुणीची हत्या केली. रात्री 9 वाजता नंदकिशोर एकटाच लॉजमधून बाहेर पडला. याबाबत लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. कर्मचाऱ्यांनी खोलीत जाऊन बघितल्यानंतर तरुणी निपचित पडल्याचे दिसून आले. ठाणे नगर पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक लॉजमध्ये धडकले आणि चौकशी सुरु केली. हत्येचा हा प्रकार सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान घडला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रेयसीचं इतर व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दोन तासात पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात
पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत केवळ दोन तासात ठाण्यातील तलावपाळी परिसरातून नंदकिशोर याला ताब्यात घेतलं. या हत्येप्रकरणी आज बुधवारी पहाटे आरोपीविरुद्ध ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि मृत तरुणीची फेसबूकवरुन ओळख झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हत्येच्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातारवरण पसरलं आहे.
आईच्याविरोधात लेकरानं जबाब दिला
क्षुल्लक वादातून पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली आहे. पतीनं साडी घेऊन दिली नाही या कारणावरून संतापलेल्या पत्नीने आधी पतीच्या डोक्यात प्रेशर कुकर मारला आणि त्यानंतर गळा घोटून त्याला जिवे मारलं. यावेळी त्यांचा सात वर्षांचा चिमुकला देखील घरातच होता. त्याच्यासमोर आईने वडिलांना मारल्याचं त्याने पाहिलं. पोलिसांना घटना समजताच बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला तत्काळ ताब्यात घेतलं आहे. हरेराम सिंग असं मृत्यू झालेल्या पतीचं नाव असून आरोपी पत्नीचं नाव सुनीता देवी आहे.


COMMENTS