बंगळूर: "आयुष्य पुरे झालं" असा भावनिक व्हॉट्सअॅप संदेश प्रियकराला पाठवून एका २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने तलावात उडी म...
बंगळूर: "आयुष्य पुरे झालं" असा भावनिक व्हॉट्सअॅप संदेश प्रियकराला पाठवून एका २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने तलावात उडी मारून जीवन संपवले. बंगळूरमधील संकी टँक परिसरात ही घटना घडली.तेजस्विनी (वय २० रा. चिक्काबनवरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
तेजस्विनी जलहळ्ळी येथील एमईएस रिंग रोडवरील एका खासगी महाविद्यालयात बी.कॉम.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तेजस्विनी महाविद्यालयातून बाहेर पडली. मात्र ती घरी न जाता परिसरात काही वेळ फिरत राहिली. त्यानंतर दुपारी सुमारे ३.५५ वाजता ती संकी टँक परिसरात गेली.
Crime News: "माझी आई IAS आहे..." लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीचं डोकं विटेने फोडलं, पोलिसांनाही अरेरावी
तलाव परिसरात फेरफटका मारला, दगडावर बसली; सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, तलाव परिसरात ती बराच वेळ फेरफटका मारत होती. काही वेळ ती एका दगडी स्लॅबवर बसली होती. तसेच तलावाच्या खालच्या भागाकडे ती अनेकदा गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास तिने तलावात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.सीसीटीव्ही फुटेजनुसार, तलावाकडे जाण्यापूर्वी तेजस्विनीने जवळील दुकानातून पाण्याची बाटली खरेदी केली होती. दुपारी ३.५५ वाजता ती तलाव परिसरात प्रवेश करताना दिसते, तर सायंकाळी ५.५५ वाजता ती शेवटची सीसीटीव्हीत दिसली. त्यानंतर ती परिसरातून बाहेर पडल्याचे कोणतेही फुटेज समोर आलेले नाही.
"आयुष्य पुरे झालं..." प्रियकराला मेसेज केला अन्...
तलावात उडी मारण्यापूर्वी तिने आपल्या प्रियकराला व्हॉट्सअॅपवर "आयुष्य पुरे झालं आहे, आता सर्व काही संपवायचं आहे," असा मेसज पाठवला होता. त्यानंतर तिने मोबाईल बंद केला. मेसज पाहताच प्रियकराने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र मोबाईल बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तेजस्विनीच्या आई पुष्पा यांना याबाबत माहिती दिली आणि तिला समजावण्याची विनंती केली.
घाबरलेल्या पुष्पा यांनी तातडीने नातेवाईकांना माहिती देत मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर त्यांनी सदाशिवनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिस, अग्निशमन दल, आपत्कालीन सेवा कर्मचारी आणि कुटुंबीयांनी सोमवारी मध्यरात्री १ वाजेपर्यंत संकी टँक परिसरात शोधमोहीम राबवली. या वेळी तलावाजवळ तिची बॅग आणि मोबाईल फोन सापडला. मंगळवारी सकाळी १८व्या क्रॉस प्रवेशद्वाराजवळ तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.


COMMENTS