मुंबई : लोणावळा-कर्जत घाट विभागातील तिसरी मार्गिका पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने १८ ते २४ जुलैदरम्यान अनेक लांब पल्ल्याच...
मुंबई : लोणावळा-कर्जत घाट विभागातील तिसरी मार्गिका पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने १८ ते २४ जुलैदरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.
या कालावधीत १३ एक्सप्रेस गाड्या रद्द, तर २० एक्सप्रेस गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. दोन गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन आणि दोन गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे ३७ एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.
६ जुलैला झालेल्या मुसळधार पावसानंतर लोणावळा-कर्जत घाट विभागात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने तिन्ही मार्गिका बाधित झाल्या होत्या. त्यानंतर मध्य मार्गिका आणि दक्षिण-पूर्व डाऊन मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या. सध्या या दोन मार्गिकांवरून रेल्वे वाहतूक सुरू असून, उर्वरित तिसरी मार्गिका पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर सुरू आहेत.
या गाड्यांवर परिणाम
चेन्नई एक्सप्रेस, हैदराबाद एक्सप्रेस, दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस, दादर-सातारा एक्सप्रेस, दौंड-इंदूर एक्सप्रेस, हडपसर-जोधपूर एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेस यांसह १३ एक्सप्रेस गाड्या विविध तारखांना रद्द राहतील. विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस, मदुराई-लोकमान्य टिळक टर्मिनस, कराईकल-लोकमान्य टिळक टर्मिनस, चेन्नई-एकतानगर, सिकंदराबाद-राजकोट, पुणे-सांतरागाछी, सांतरागाछी-पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम इत्यादी २० एक्सप्रेस गाड्या विविध पर्यायी मार्गांवरून धावतील.
चार गाड्यांच्या प्रवासात बदल
हाॅस्पेट-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस पुणे येथे, तर कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस खडकी येथे प्रवास समाप्त करेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर एक्सप्रेस पुणे येथून, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हॉसपेट एक्सप्रेस खडकी येथून प्रवास सुरू करेल.


COMMENTS