सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची आणि तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची आणि तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या एका तरुणाने लग्न करण्याचे आमिष दाखवून या मुलीचे लैंगिक शोषण केले. मात्र, या संपूर्ण प्रकरणात पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल करताना, स्वतःवर अत्याचार करणाऱ्या आरोपीसोबतच आपले लग्न लावून द्यावे, अशी अजब मागणी केल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. बिहारमधील मुझफ्फरपूर परिसरातील ही घटना आहे.
वाढदिवसावा बोलावलं अन्...
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, घरच्या आर्थिक अडचणींमुळे ती स्थानिक एका मॉलमध्ये काम करत होती. याच दरम्यान तिची ओळख जवळच्याच दुसऱ्या एका मॉलमध्ये काम करणाऱ्या तरुणाशी इन्स्टाग्रामवर झाली. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली. एका दिवशी आरोपीने पीडितेला त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केले. तिथे त्याने तिच्या शीतपेयामध्ये अंमली पदार्थ मिसळले. पीडित मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
लग्नाचे खोटे आश्वासन
यानंतर, 'मी तुझ्याशी लग्न करेन' असे खोटे आश्वासन देऊन आरोपीने तिला वारंवार आपल्या घरी बोलावले आणि तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. या काळात पीडित मुलगी गरोदर राहिली असता, आरोपीने तिला जबरदस्तीने अनेक वेळा गर्भपाताच्या गोळ्या खायला घालण्यास भाग पाडले. जेव्हा पीडितेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली, तेव्हा आरोपीने तिची फसवणूक करत लग्नास साफ नकार दिला. इतकेच नव्हे तर त्याने तिला पुन्हा धमकावण्यास आणि त्रास देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली.
'मला त्याच्यासोबत लग्न करायचंय'
या संवेदनशील प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश कुमार यांनी सांगितले की, एका अल्पवयीन मुलीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि छळ केल्याचा आरोप एका तरुणावर केला आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत आरोपीसोबतच लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्राप्त अर्जाच्या आधारे गुन्हा (FIR) नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाचा सखोल आणि कसून तपास केला जात आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.


COMMENTS