सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदणे हा स्वत:हून फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला आ...
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदणे हा स्वत:हून फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. महिला डॉक्टरने हातावर सूसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती.
यावेळी महिला डॉक्टरच्या हातावर जी दोन नाव होती, त्यामध्ये PSI गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे होती. महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर दोन्ही आरोपी फरार होते.
पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकर याला शुक्रवारी पहाटे अटक केली होती. यानंतर सातारा पोलिस PSI बदणे याच्या मागावर होते. बदणे याचं शेवटचं लोकेशन पंढरपूरमध्ये आढळले होते. त्यामुळे तो पंढरपुरात लपला असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. त्या अनुषंगाने पोलिस तपासही करत होते. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा PSI गोपाल बदणे हा स्वत:हून फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.
गोपाल बदणे याने आपल्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केला, असा आरोप मृत महिला डॉक्टरने केला होता. पोलिसांनी बदणे याला अटक केली आहे. अटकेनंतर बदणे याने “मी प्रामाणिक आहे, पोलिस प्रशासनावर माझा विश्वास” अशी एका वाक्यात बदणे याने प्रतिक्रिया दिली आहे. रात्री उशिरा बदणेला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीस घेऊन जात असताना काही प्रसारमाध्यमांनी त्याला प्रतिक्रिया विचारली. यावेळी त्याने आपण प्रमाणिक असून पोलिस प्रशासनावर आपला विश्वास असल्याचे म्हटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS