राज्यात सध्या आज होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेचा झ...
राज्यात सध्या आज होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेचा झोड सुरु आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी "मी कुठलाही सामना पाहत नाही त्यामुळे मला माहिती नाही", असे सांगितले.
तसेच विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या भरतीबद्दल मुख्यमंत्री म्हणाले,"राज्यातल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे. मागच्या काळामध्ये ८० टक्के पद भरण्याची परवानगी ही राज्य शासनाने दिली होती. आम्हाला पारदर्शकपणे ही भरती करायची आहे. त्यामुळे काही वेळ गेला पण आता मात्र लवकरच पद भरती होईल."
राज्यात आणखी एक चर्चेचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा जीआर. राज्य सरकारने मराठा समाजाच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य करत शासन निर्णय जरी केला. परंतु यास राज्यातील इतर घटकांमधून विरोध मिळत आहे. ओबीसी समाजाने या जीआर विरुद्ध आंदोलन करण्याचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले," दोन्ही बाजूनी यामध्ये राजकारण केलं जात आहे. हा GR कुठेही ओबीसींच्या हक्कावर गदा आणणारा नाही. एकही नकली व्यक्ती हा ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही अशी काळजी आम्ही घेतली आहे. विजय वडेट्टीवार यांना तर बोलण्याचा अधिकारच नाही कारण ओबीसी समाजाकरता जे काही केलं आहे ते आमच्या सरकारने केलं आहे. २०१४ ते २०२५ मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजाच्या कल्याणाचे झाले ते आमच्या सरकारमध्ये झाले. ओबीसी समाजाचे वेगळे मंत्रालय आणणारे आम्ही, ओबीसी समाजासाठी नव्या योजना तयार करणारे आम्ही, महाज्योती तयार करणारे आम्ही,
उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ओबीसींच घालवलेलं राजकीय आरक्षण हे परत आणणारे आम्ही. ओबीसीला हे माहिती आहे की त्यांचे हित पाहणारे कोण आहेत. नेत्यांनी माझ्यासोबत खुली चर्चा करावी. यांना केवळ राजकारण करता येतं. आम्हाला ओबीसी समाजाचं हित करायचं आहे ते आम्ही करणारच. यासह मराठा समाजाचं हित देखील आम्हीच करू." अशा शब्दांत त्यांनी विरोधकांची बोलती बंद केली.
तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणासाठी भरत कराड याने केलेल्या आत्महत्येविषयी देखील मत व्यक्त केले. "मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजातले नेते खरी वास्तविकता काय आहे हे समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत तोपर्यंत दोन समाजांमधील ही तेढ कमी होणार नाही. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळणार आहे नोंदी नसणाऱ्यांना सर्टिफिकेट मिळणार नाही. ओबीसी समाजाने चिंता करू नये. विरोधकांकडून आरक्षण गेलं आहे असं वातावरण तयार केलं जात आहे आणि त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत आहे. आम्ही समाजाची काळजी घेत आहोत. त्यांनी राजकारण करू नये."


COMMENTS