उस्मानाबाद : सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लहान भावाला दारुचे व्यसन होते. सतत भांडणे कर...
उस्मानाबाद : सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लहान भावाला दारुचे व्यसन होते. सतत भांडणे करून शेतात येऊ देत नसल्याच्या कारणावरून मोठ्या भावाने आणि त्याच्या मुलाने लहान भावाचा काठीने आणि दगडाने मारहाण करून खून केला आहे.
परंडा तालुक्यातील सोनगिरी येथील शेतातील सततच्या भांडणाला कंटाळून सख्या भावानेच मुलाच्या मदतीने काठीने मारहाण करत दगडाने ठेचून भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २४) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनगिरी येथील महादेव भानुदास खरपुडे आणि सुधीर महादेव खरपुडे या बाप लेकांना पोपट खरपुडे हा शेतात येऊ नका म्हणून सतत वाद घालत होता. याच कारणावरून रविवारी सकाळी १० वा.सु. पोपट खरपुडे आणि भाऊ महादेव त्यांचा मुलगा सुधीर यांच्यात भांडण झाले होते. शेवटी सततच्या भांडणाला कंटाळून बाप-लेकाने महादेव खरपुडे आणि सुधीर महादेव खरपुडे यांनी पोपट खरपुडे यांना काठीने व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत पोपट खरपुडे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.
मारहाणीत मृत्यू पावलेल्या पोपट खरपुडे यांना दोन मुली आणि एक मुलगा असून तो सतत त्रास देत असल्याने त्यांची पत्नी आणि मुलांनी दहा वर्षांपूर्वी पोपट यांना सोडून दिले होते. पोपट हा त्याचा भाऊ महादेव यासह शेजारील लोकांना त्रास देत होता. भावाला शेतात येऊ देत नव्हता तसेच नेहमी भांडण करत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून रविवारी सायंकाळी काठीने आणि दगडाने मारहाण करून ठार केले. या प्रकरणी नवनाथ वेताळ यांच्या फिर्यादीवरून महादेव खरपुडे आणि सुधीर खरपुडे या पिता-पुत्रा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे हे करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे, पोलिस कर्मचारी विशाल खोसे, दिलीप पवार, बळी शिंदे, एस.सी. गायकवाड, ए.बी. वाघमारे, चालक भेगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला दरम्यान, भूमचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
COMMENTS